---Advertisement---
Jasprit Bumrah : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा जगातील नंबर 1 कसोटी गोलंदाज बनला आहे. विशेषतः 27 दिवसांतच बुमराहने पुन्हा नंबर वन गोलंदाजाचा मान मिळवला आहे.
बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या ICC कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहने दोन गोलंदाजांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा अव्वल स्थानावर तर, जोश हेझलवूड दुसऱ्या स्थानावर होता. आता पर्थमधील त्याच्या अप्रतिम कामगिरीनंतर बुमराहने या दोघांनाही मागे टाकत नंबर 1 गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.
ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराह ८८३ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा रबाद ८७२ रेटिंग गुणांसह दुसऱ्या तर जोश हेजलवूड ८६० रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑफस्पिनर आर अश्विन चौथ्या स्थानावर आहे.
30 ऑक्टोबर रोजी जसप्रीत बुमराहचे नंबर 1 रँकिंग हिरावले गेले. त्याच्या जागी रबाडाने ते स्थान गाठले होते. पण 27 दिवसांतच बुमराहने पुन्हा नंबर वन गोलंदाजाचा मान मिळवला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमराह ज्या फॉर्ममध्ये दिसत आहे, ते पाहता त्याला पहिल्या क्रमांकावरून हटवणे केवळ कठीणच नाही तर अशक्य दिसत आहे.
पर्थ कसोटीत बुमराहने एकूण 8 विकेट घेतल्या, त्यापैकी पहिल्या डावात त्याने 5 विकेट घेतल्या. पर्थमध्ये अवघ्या 150 धावांत आटोपलेल्या टीम इंडियाने केवळ बुमराहच्या जोरावर पुनरागमन केले.
आता बुमराहला कसोटी मालिकेत आणखी 4 सामने खेळायचे आहेत आणि त्याची कामगिरी अशीच सुरू राहिली तर त्याला पहिल्या क्रमांकावरून कोणीही हटवू शकणार नाही.









