तरुण भारत लाईव्ह । २९ जानेवारी २०२३। चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज पोलिस लाइनशेजारीच दत्त कॉलनीतील कलंत्री यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी लाखोंवर डल्ला मारला. हि घटना शुक्रवारी सकाळी उघडीस आली.
सीए राजेश रमेश कलंत्री दत्त कॉलनीत कुटुंबासह वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी मुलगी नेहा सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिचा सत्काराचा कार्यक्रम हा कलंत्री यांच्या बीड येथील सासूरवाडीत आयोजित करण्यात आला होता.त्यानुसार कलंत्री कुटुंबीय गुरुवारी सकाळी बीडसाठी रवाना झाले होते. शुक्रवार सकाळी घरकाम करणारी महिला कामावर आल्यावर तिला कडीकोयंडा आणि कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले.
महिलेने लागलीच कलंत्री यांचे मावसभाऊ स्वप्नील लाठी यांच्याकडे धाव घेऊन घरात चोरी झाल्याची माहिती दिली. लाठी यांनी राजेश कलंत्री आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही मिनिटांनी स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
चोरट्यांनी घरामधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एक लाख ७० हजार रुपये रोख, दो लाख ७० हजारांचे नऊ तोळे सोने, ७० हजार रुपये किमतीचे दीड-दोन किलो चांदीचे भांडे, एक लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी असा एकूण सहा लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. कलंत्री कुटुंबीयांनी कपाटात एक लाख ३४ हजार रुपये रोख सांभाळून ठेवली होती. सुदैवाने ती रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही. त्यामुळे ती रक्कम सुरक्षित राहिली.