धुळे : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून राज्यव्यापी संपावर आहेत. या संपा दरम्यान धुळे येथे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे शहरातील कल्याण भवन येथे अॅड. सदावर्ते यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सदावर्ते मुर्दाबादसह ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ अशा घोषणा संपकरी कर्मचार्यांनी या वेळी दिल्या. अॅड. सदावर्तेच्या पुतळ्याचे दहन करण्याचे कारण म्हणजे, कर्मचार्यांचा संप बेकायदा असल्याबाबत अॅड. गुणवंत सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
तीन दिवसांपासून अठरा लाख राज्य सरकारी कर्मचारी संपात उतरले आहेत. याची नोंद घेत अॅड. सदावर्तेंनी त्यांच्याशी टक्कर घेऊ नये, असा इशारा समन्वय समितीचे निमंत्रक तथा राज्य कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी दिला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, एस. यू. तायडे, प्रतिभा घोडके यांच्यासह महिला कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, राज्य सरकारने आउट सोर्सिंगद्वारे नऊ कंपन्यांना एक लाख कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचीही या वेळी होळी करण्यात आली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे धोरण शासन जाहीर करीत नाही तोपर्यंत संप मागे घेण्याचा प्रश्नच नाही, सरकार जाणीवपूर्वक छोट्याछोट्या संघटनांना हाताशी धरून संप मागे घेतल्याच्या बातम्या पसरवून कर्मचार्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे, असे डॉ. पाटील म्हणाले.