जळगाव : शहराच्या शांततेसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने १० विविध परिसरांना शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्रांमध्ये वाहनांचे हॉर्न, लाऊडस्पीकर, कोणत्याही प्रकारचे वाद्य, तसेच फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, या क्षेत्रांभोवती १०० मीटरपर्यंत कोणताही मोठा आवाज होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अशी आहेत शांतता क्षेत्रे
सर्व शैक्षणिक संस्थांचा परिसर.
सर्व न्यायालय परिसर व त्यालगतचे रस्ते.
सामान्य व खासगी रुग्णालय परिसर.
पांडे चौक ते आप्पा महाराज समाधी रस्ता.
ला.ना. हायस्कूल ते सागर हायस्कूल परिसर.
एम.जे. महाविद्यालय व सभोवतालचा परिसर.
रहिवासी भागातील मंगल कार्यालय परिसर.
आवाजावर कठोर मर्यादा
रहिवासी भागातील मंगल कार्यालयांसाठी सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत आवाजाची मर्यादा ५५ डीबी तर सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत ४० डीबीपर्यंत ठेवण्याचा नियम आहे.
शांतता क्षेत्रांचे फलक आवश्यक
परिसरांमध्ये शांतता क्षेत्राचे फलक नसल्यामुळे अनेक ठिकाणी हॉर्न, डीजे आणि फटाक्यांचा त्रास सुरूच आहे. महापालिकेने शांतता क्षेत्रे जाहीर करूनही या ठिकाणी फलक लावलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना फलक लावून तक्रारीसाठी संपर्क क्रमांक देण्याची मागणी आहे.
डी.जे.च्या दणदणाटामुळे त्रास
डी.जे.च्या मोठ्या आवाजामुळे हृदयविकार रुग्ण, लहान मुले आणि विद्यार्थ्यांना त्रास होत असून अनेक वेळा काचा हादरण्याचे प्रकारही घडले आहेत. तक्रारींनंतर आयोजक व डीजे मालकांवर दंडात्मक कारवाई होत आहे.
महापालिकेने कडक उपाययोजना केल्यास, शहरातील शांतता कायम राखणे शक्य होईल. नागरिकांनीही सहकार्य करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.