---Advertisement---
जळगाव : शहरात कचरा संकलनाचा ठेका मिळालेल्या बीव्हीजी इंडिया कंपनीच्या कामकाजावरून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कंपनीने १ सप्टेंबरपासून काम सुरू केले असले, तरी पहिल्याच आठवड्यात गोंधळ आणि अव्यवस्था दिसून येत आहे. कंपनीची कार्यपद्धती आणि कामगारांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांबाबतच्या तक्रारींमुळे हा नवा ठेका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
पूर्वीच्या वॉटरग्रेस कंपनीचे कामगार नागरिकांच्या हातातून कचरा घेऊन तो घंटागाडीत टाकत होते, ज्यामुळे नागरिकांची मोठी सोय होत होती. मात्र, बीव्हीजी कंपनीच्या कामगारांनी ही पद्धत बदलली आहे. आता कामगार फक्त गाडीचालकाला मदत करतात; पण कचरा उचलण्यास नकार देतात. त्यामुळे नागरिकांना आपला कचरा स्वतःच गाडीत टाकावा लागतो. या अचानक बदललेल्या पद्धतीमुळे विशेषतः महिलांमध्ये संताप असून, रोजच कामगार आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.
बीव्हीजी कंपनीचे काम संथ
बीव्हीजी कंपनीचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गल्लीबोळांबरोबरच मोहाडी रोड, महाबळ, संभाजी चौक आणि सिंधी कॉलनी यांसारख्या प्रमुख मार्गावरही कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून हा कचरा उचलला नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.