---Advertisement---
जळगाव : शहरातील साफसफाईचा मक्ता मागील पाच वर्षांपासून वॉटर ग्रेस या कंपनीकडे होता. त्यांच्या मक्त्याची मुदत संपली आहे. महापालिकेने आता हा मक्ता बीव्हीजी इंडिया कंपनीला दिला आहे. दररोज ५०० कर्मचारी लावण्याचे करारनाम्यात नमुद करण्यात आले आहे. परंतु पहिल्याच दिवशी सोमवारी ८७ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. मक्तेदार नवीन असल्यामुळे काही भागात कचरा तसाच पडून होता. तसेच शासकीय आयटीआय समोर असलेल्या रॅम्पजवळ चिखल असल्यामुळे घंटागाड्यांचे चाक गाऱ्यात रूतत असल्याने दुपारी तीन वाजेपर्यंत आयटीआयसमोर घंटागाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.
शहरातील साफसफाईचा मक्ता देण्यासाठी महापालिकेने निविदा काढली होती. यात वॉटरग्रेस प्रॉडक्टस् आपण निविदेस पात्र असल्याचा दावा करत मक्ता आपल्याच मिळावा म्हणून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देतांना वॉटरग्रेसची याचिका फेटाळून बीव्हीजी इंडिया कंपनीला मक्ता देण्याचे आदेश खंडपीठाने दिला आहे. यानुसार बीव्हीजी इंडिया कंपनीला मनपाने कायदिश दिले आहेत.

सोमवार १ सप्टेंबरपासून बीव्हीजी इंडिया कंपनीने शहरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. परंतु करारनाम्यात दैनंदिन साफसफाईसाठी ५०० कामगार पुरविण्याची अट असतांना पहिल्याच दिवशी बीव्हीजी कंपनीकडून ८७ कर्मचारी कमी पुरविण्यात आले. तसेच कंपनी नवीन असल्यामुळे पुर्णपणे व्यवस्थित नियोजन होऊ शकले नाही, त्यामुळे शहरातील मार्केट परिसरातील कचरा उचलण्यात दिरंगाई झाली व सायंकाळपर्यंत सुभाष चौकापासून ते चौबे शाळा परिसरात ठिकठिकाणी कचरा कुंड्या ओसांडून वाहत होत्या. तसेच विविध कॉलन्यांमध्ये घंटागाडी चालक व हेल्पर यांच्याकडून घरोघरी ओला व सुका कचरा वेगवेगळा द्यावा, त्यासाठी प्रत्येकाने दोन डस्टबीन ठेवाव्यात, अशा सूचना देण्यात येत असल्यामुळे अनेक भागात उशिराने घंटागाड्या पोहचल्या.
बीव्हीजी कंपनीकडून सोमवारी शहरातील साफसफाईच्या कामाचा शुभारंभ केला. या कामाचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आयुक्तांनी घंटागाड्यांना हिरवा झेंडा दाखवून कचरा संकलनाचा प्रारंभ केला. यावेळी कंपनीचे प्रतिनिधी-कर्मचाऱ्यांसह मनपाचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, वाहन विभागाचे बाळासाहेब लासूरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.