नंदूरबार : जिल्ह्यातील ८४ ग्रामपंचायतीतील १११ सदस्यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे रोजी मतदान होणार असल्याची माहिती सामान्य विभागाने दिली आहे.
पोटनिवडणूक का?
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र २५ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत.
नामनिर्देशनपत्रांची छाननी ३ मे २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ८ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. १८ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असून मतमोजणी १९ मे रोजी होणार आहे.