तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला तरी अद्यापही अजित पवार यांच्या गटातील मंत्र्यांना खातेवाटप झालेलं नाही. खाती वाटपावरुन राष्ट्रवादी व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच असल्याने मंत्रीमंडळ विस्तार देखील रखडले आहे. सर्वात आधी भाजपा आणि शिंदे गटातील राहिलेला मंत्रिमंडळ विस्तार करावा आणि त्यानंतरच खाते वाटप करावा, असा सूर शिवसेनेच्या आमदारांचा असल्याची माहिती समोर येत आहे.
अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक ही खाती राष्ट्रवादीला हवी असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर, क्रीडा आणि शिक्षण यापैकी एक खाते अजित पवार गटाला हवं असल्याचं समजतंय. मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती समोर येत आहे.
तर गृह आणि सहकार खात भाजप स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. गृह खात्याच्या अदलाबदलीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. ही दोन महत्वाची खाती भाजप आपल्याकडे ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे.