छत्रपती संभाजीनगर : सात वर्षाच्या कालखंडानंतर आज, शनिवारी छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मराठवाड्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. विकासाचा अनुशेषही बाकी आहे. या अनुषंगाने बैठकीतून पदरी काय पडणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. असे असतानाच राज्य शासनाने बैठकीपूर्वी औरंगाबाद व उस्मानाबाद शहर, उपविभाग व जिल्ह्याचे नामांतर अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव असे केले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्याला ४० ते ४५ हजार कोटींचे पॅकेज मिळण्याची शक्यता आहे.
मराठवाड्याचा आरोग्य, सिंचन, रस्ते यासह विविध क्षेत्रांतील अनुशेष अद्याप भरून काढणे बाकी आहे. त्यासाठी भरीव अशी तरतूद करण्यासाठी, ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ओरड केली जात आहे. मराठवाड्यातील प्रश्नांवर चर्चा करून ठोस तरतूद करण्यासाठी येथे वर्षातून किमान एकदा तरी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी नेहमीची आहे. शहरात २००८मध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर दुसऱ्या बैठकीसाठी आठ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. चार ऑक्टोबर २०१६ रोजी येथे बैठक झाली. त्यानंतर सहा वर्षे १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज, शनिवारी येथील स्मार्ट सिटीच्या कार्यालयात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.
या बैठकीच्या अनुंषगाने प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या जिल्ह्यातील निर्णयांच्या अंमलबजावणीची स्थिती, जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे प्रस्ताव तयार करावेत, लागणाऱ्या निधीबाबत माहिती द्यावी; तसेच जिल्ह्याचा आणि विभागाचा विकास होण्याच्या दृष्टीने हे प्रस्ताव तयार करून सादर करावे, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्यात आहेत. विविध कामांचे सुमारे ५० ते ५५ हजार कोटींचे हे प्रस्ताव असल्याचे सूत्रांनी सांगितले.