जळगाव : समाजसेविका व स्वयंसेवी संस्थांना ‘या’ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

तरुण भारत लाईव्ह | जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेविका व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते.

 

जळगाव जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेविका व स्वयंसेवी संस्थांना पुरस्कार देण्यासाठी पात्र महिला व स्वयंसेवी संस्थांकडून सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व सन २०२३-२४ या वर्षासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

 

पुरस्कारासाठी पात्रता व निकष (राज्यस्तरीय पुरस्कार) महिला व बाल कल्याण क्षेत्रात मौलिक कामगिरी बजावणाऱ्या नामवंत समाजसेविका असाव्यात, महिला व बाल कल्याण क्षेत्रात कमीत कमी २५ वर्षे कार्य केलेले असावे, ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याच्या ५ वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

 

विभागीयस्तर पुरस्कार (स्वयंसेवी संस्थांकरिता) – महिला व बाल कल्याण क्षेत्रात महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शिक्षण, पुनर्वसन, अंधश्रध्दा निर्मुलन, जनजागरण इ. क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल, संस्थेचे कार्य महिला व बाल कल्याण क्षेत्रात किमान ७ वर्षे असावे, ज्या स्वयंसेवी संस्थेस दलितमित्र पुरस्कार मिळालेला आहे त्या संस्थेस हा पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही, संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तसेच तीचे कार्य व सेवाही पक्षातील व राजकारणापासून अलिप्त असावी.