नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान संयुक्त किसान मोर्चाकडून आज ग्रामीण भारत बंद पुकारण्यात आला असून सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा बंद असेल. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी 16 फेब्रुवारीला पुकारलेल्या ग्रामीण ‘भारत बंद’ला वैचारिक बंद म्हटलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
किमान आधारभूत किमतीची हमी देण्यासाठी कायदा करावा या मागणीसाठी कामगार संघटनांसह शेतकरी संघटनांनी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलनाला सुरुवात केली असून आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. आज भारत बंदची (ग्रामीण) हाक देण्यात आली आहे. सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे. त्याआधी, गुरुवारी पंजाबमध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आणि टोल प्लाझावर निदर्शने केली. शेतकऱ्यांनी ट्रॅकसह रस्ते अडवले. दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर लुधियाना-साहनेवाल-चंदीगड मार्गावरील सहा गाड्या वळवण्यात आल्या आहेत. दिल्ली-अमृतसर मार्गावरील काही गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या.
संयुक्त किसान मोर्चाने आज देशव्यापी संप पुकारला असून त्याला ‘ग्रामीण भारत बंद’ असे नाव देण्यात आले आहे. ग्रामीण भारत बंद सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आज भाजीपाला आणि इतर पिकांचा पुरवठा आणि खरेदी स्थगित राहील. ग्रामीण भागातील सर्व दुकाने, धान्य बाजार, भाजी मंडई, शासकीय आणि निमसरकारी कार्यालये, ग्रामीण औद्योगिक व सेवा क्षेत्रातील संस्था आणि खाजगी क्षेत्रातील उद्योग बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.