तरुण भारत लाईव्ह न्यूज : सोशल मीडिया वर अनेकदा असे मेसेज येत राहतात, जे दोन समाजात तेढ निर्माण करतात. असे प्रकार टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून २४ तास सोशल मीडिया पेट्रोलिंग करण्यात येत आहे. तसेच सोशल मिडीयाचे माध्यमांतून धार्मिक व जातीय भावना दुखावुन दोन समाजात तेढ निर्माण होतील असे स्टेटस, व्हिडीओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकुर, एसएमएस, तयार करून प्रसारित करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे. तर १ जानेवारी ते १७ मार्चपर्यंत एकुण ८० व्यक्ती विरोधात वरील नमुद कलमानुसार १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सामाजिक शांतता खराब करून अशांतता होईल असे वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुध्द कलम १५३, १५३ (अ), २९५ (१) कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर आक्षेपार्ह, वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या लोकांवर कठोर कायदेशीर कारवाईला सामोर जावे लागणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये पोलीस ठाणे खुलताबाद, सिल्लोड ग्रामीण, वैजापुर, पिशोर (प्रत्येकी ०२ गुन्हे) तर पाचोड, बिडकीन, कन्नड शहर, फुलंब्री, गंगापुर (प्रत्येकी ०१) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याच पार्श्वभुमीवर पोलिसांकडुन सुचना केल्या जात आहेत. नागरिकांनी सोशल मीडियाचे माध्यमांतून पसरविण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची सर्व प्रथम खात्री करणे अत्यावश्यक आहे. पोलीस सर्व परिस्थीतीला हाताळण्यास सक्षम असून सायबर पोलीस टिम तंत्रज्ञान व विशेष दुलच्या साहय्याने सर्व प्रकारच्या सोशल मीडिया साईटवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलिसांची सोशल मीडिया पेट्रालिंग नियमित सुरु आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कारवाई केली जाणार आहे.