‘हा’ देश भारतविरोधी कारवाया थांबण्याचे नाव घेत नाहीय, पुन्हा हिंदू मंदिरात तोडफोड

नवी दिल्ली : कॅनडामध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे.  येथील हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. काळे कपडे परिधान केलेले आणि तोंडावर मास्क लावून आलेल्या समाजकंटकांनी ओंटारियो येथील मंदिरात तोडफोड केली. मंदिराच्या भिंतीवर भारताविरोधात आक्षेपार्ह संदेश लिहिला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  दरम्यान, कॅनडामध्ये हिंदू मंदिरात अशा प्रकारे तोडफोड केल्याची चार महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. याआधी ब्रॅम्पटन येथे एका मंदिरात तोडफोड केली होती. याच वर्षी ३१ जानेवारीला घटना घडली होती.

या संशयित आरोपींपैकी एक जण पहारा देत होता. तर त्यातील एकाने  मंदिराच्या भिंतीवर स्प्रे पेंटिंग करून भारतविरोधी संदेश लिहिला.

कॅनडामध्ये कधी मंदिरे तर कधी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्चच्या अखेरच्या आठवड्यात बर्नबायमध्ये एका विद्यापीठाच्या आवारातील गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड केली होती. त्यावर भारताने तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला होता. काही दिवसांपूर्वी खलिस्तानी समर्थकांनीही भारतविरोधी घोषणा करून वाणिज्य दूतावासात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.