---Advertisement---
एरंडोल : येथे राज्य शासनातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेला जी.आर.त्वरित रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी ‘ओबीसी’ समाजातर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांचेसह उपस्थित पदाधिका-यांच्या हस्ते प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. शासनाने जी. आर. रद्द न केल्यास ओबीसी समाजातर्फे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी ‘ओबीसी’ समाजातील युवकांनी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढली.रॅलीत सहभागी झालेल्या युवकांनी दिलेल्या विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मोर्चात सहभागी झालेल्या विविध ओबीसी समाजातील पदाधिका-यांच्या हातातील विविध घोषणांचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.शासनाने मराठा समाजाला आरक्षण देतांना काढण्यात आलेल्या जी.आर.मुळे ओबीसी समाजावर अन्याय करण्यात आला असून सदरचा जी. आर.त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही मात्र त्यांना ‘ओबीसी’ मधून आरक्षण न देता स्वतंत्रपणे देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत शासनाने त्वरित दखल घेवून जीआर रद्द करून ओबीसी समाजावरील अन्याय दूर करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, राजेंद्र चौधरी,समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन, सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष गजानन महाजन, कैलास महाजन, योगेश महाजन, नाना महाजन, इच्छाराम माळी, सुनील चौधरी, आनंदा चौधरी, दीपक माळी, भगवान चौधरी, रमेश माळी, पंकज महाजन, सुदर्शन महाजन, मयूर महाजन,अनिल वाणी,अनिल महाजन,रामचंद्र गांगुर्डे,सचिन विसपुते, रुपेश माळी, गुलाब चौधरी, अरुण महाजन, अतुल महाजन, तुषार शिंपी, गणेश न्हावी,डॉ. नरेंद्र पाटील, राजधर महाजन,अनिल चौधरी,संदीप पाटील,गोपाल महाजन यांचेसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.