अडावद, ता.चोपडा : येथून जवळ असलेल्या विष्णापूर ता.चोपडा येथील एका पत्रीशेडच्या घरावर छापा मारुन सुमारे ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा पोलीसांनी जप्त केला. अडावद पोलीसांच्या या धडक कारवाईने जिल्हाभरातील गांजा तस्करांचे धाबे दणाणले असून पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. याप्रकरणी मुद्देमाल, वजनकाटा व मोटार सायकलसह एकास पोलिसांनी अटक केली आहे.
विष्णापूर येथील सायसिंग बरकत बारेला (वय-३६) हा गावातील शिवाजी पाडा परिसरातील एका गोडावून वजा पत्रीशेडमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध गांजा बाळगत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने दि. २७ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास चोपड्याचे पोलीस उपविभागिय अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, पो.नि. कावेरी कमलाकर, यांच्या मार्गदर्शनाखाली अडावदचे सपोनि संतोष चव्हाण, पोउनि राजु थोरात, पो.हे.काँ भरत नाईक, ज्ञानेश्वर सपकाळे, संजय धनगर, सतिष भोई, भुषण चव्हाण, जयसिंग राजपूत, मधुकर पवार यांच्या पथकाने छापा मारुन ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला.
तसेच ६ हजार रुपये किंमतीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक लाख रुपये किंमतीची मोटार सायकल यासह सायसिंग बारेला यास अटक केली आहे. याप्रकरणी अडावद पो. स्टे. गुन्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास सपोनि संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ अन्वर तडवी हे करित आहेत.