कारचे टायर फुटून अपघात; जिल्हा केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी थोडक्यात बचावले

तरुण भारत लाईव्ह | जळगाव : नशिराबाद येथील पुलावर अपघातांचे सत्र सुरूच असून आज जिल्हा केमिस्ट संघटनेचे सचिव अनिल झंवर यांच्या चारचाकी गाडीचे टायर फुटून अपघात झाला. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने गाडीतील चौघे जण सुखरुप आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा केमिस्ट संघटनेचे सचिव अनिल झंवर यांच्या समवेत भाजपच्या केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीचे प्रदेश सहसंयोजक तथा जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे, इरफान सालार, दिनेश मालू हे शनिवारी २२ रोजी यावल-रावेर येथील केमिस्ट संघटनेची बैठक आटोपून परत येत होते. दरम्यान भुसावळहून जळगावच्या दिशेने येत असतांना दुपारी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या चारचाकी क्रमांक एमएच १९ सीओ ८२४० या गाडीचे टायर फुटून वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी गाडी पलटी झाली. कार पलटी झाल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी लागलीच धाव घेत चारचाकीतील सर्वांना बाहेर काढण्यास मदत केली. या अपघातात कोणालाही इजा पोहचलेली नसून सर्व जण सुखरूप आहेत.