चाळीसगाव : शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूट मालकाकडे ३ लाख रुपये द्या नाहीतर तुझ्यासह तुझ्या परिवाराला पॉस्कोच्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी देत त्यांच्याकडुन १ लाख २० हजार रुपये खंडणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी घेतल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाली. त्यांनी तात्काळ संबंधित तक्रारदार यांच्यासह शहर पोलीस स्टेशन गाठून ४ तास ठिय्या दिला. त्यानंतर खंडणी उकळणारे संबंधित पोलीस कर्मचारी अजय पाटील व त्याचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी सदर पोलीस कर्मचारी याच्या घरून त्याने खंडणी घेतलेले १ लाख २० हजार रुपये देखील त्याच्या घराच्या झडतीत हस्तगत करण्यात आले. ज्या पोलिसांनी नागरिकांना अपप्रवृत्ती पासून संरक्षण दिले पाहिजे तेच कायद्याचे रक्षक जर भक्षक होऊन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत खंडणी उकळत असतील तर ते कदापिही सहन केले जाणार नाही.
या प्रकरणाच्या बाबतीत मी राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असून यात सहभागी सर्व पोलिसांची IPS दर्जाच्या अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणार आहे.
मी माझ्या आमदारकीच्या पहिल्या दिवसांपासून अश्या प्रवृत्तीच्या विरोधात असून मग तो कितीही मोठा व्यक्ती असो किंवा जवळचा असो त्याला योग्य ते शासन व्हावे व पीडित नागरिकांना न्याय मिळावा असा माझा प्रयत्न राहत आला आहे.
माझी सर्व चाळीसगावकरांना विनंती आहे की, शासन प्रशासनातील कुणीही आपल्याला त्रास देत असेल, कुठेही पैश्यांची मागणी होत असेल, अडवणूक होत असेल, पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर आपण विनासंकोच माझ्याशी कधीही संपर्क साधा. मंगेश चव्हाण अश्या नागरिकांच्या पाठीशी कायम उभा राहील, अशी ग्वाही आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी दिली.