मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड आणि आलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी अखेर रवींद्र वायकर, त्यांची पत्नी तसेच इतरांविरोधात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी येथील सुप्रीमो क्लबचा गैरवापर तसेच तिथे हॉटेल बांधताना माहिती लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यांसंबंधीचे आरोप केले होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिके त्या बांधकामाची परवानगी नाकारत कामाला स्थगिती दिली होती.
आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीसह इतरांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. जोगेश्वरीतील भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वायकर यांच्या भूखंड घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्राथमिक तपास करण्यात आला होता. या प्रकरणी वायकर यांचा जबाबही नोंदवण्यात आला होता. त्यामुळे वायकर हायकोर्टात गेले होते. पण तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर आता थेट आर्थिक गुन्हे विभागाने त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
रवींद्र वायकर यांचा हा घोटाळा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघड केला होता. या घोटाळ्याची सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन माहितीही दिली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन लाख स्क्वेअर फूटाच्या भूखंडावर रवींद्र वायकर यांना जोगेश्वरीत लहान मुलांच्या खेळण्याच्या मैदानावर हॉटेल बांधायची परवानगी दिली होती. याप्रकरणी वायकर यांनी महापालिकेची फसवणूक केली होती. सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर महापालिकेने दोन महिन्यापूर्वी वायकरांना दिलेली परवानगी रद्द केली होती.