काँग्रेस खासदारांच्या घरुन ३ दिवसांत २२५ कोटींची रोकड जप्त!

भुवनेश्वर : आयकर विभागाचे झारखंड आणि ओडिशातील अनेक ठिकाणी मद्य उत्पादक कंपनीविरुद्धच्या करचुकवेगिरीप्रकरणी छापेमारी शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. आयकर अधिकार्‍यांनी आतापर्यंत रोख भरलेल्या १५६ बॅग जप्त केल्या आहेत, ज्यामध्ये २२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड सापडली आहे. ही मद्य कंपनी काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांची आहे.

आयकर अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, आयकर विभागाने शुक्रवारी तिसर्‍या दिवशी ओडिशा-आधारित मद्य उत्पादक कंपनीवर कर आकारणीवर छापे टाकले आणि रोखीने भरलेल्या १५६ बॅग जप्त केल्या. या बॅगांमधून मिळालेल्या रोख रकमेतून आतापर्यंत २० कोटी रुपये मोजले गेल्याचे त्यांनी सांगितले. या छाप्यात आतापर्यंत २२५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी बोलंगीर जिल्ह्यातील सुदापाडा येथे छापा टाकून रोख भरलेल्या १५६ बॅगा जप्त केल्या. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘१५६ बॅगांपैकी फक्त सहा-सातची मोजणी करण्यात आली, ज्यामध्ये २५ कोटी रुपये सापडले.’ आयकर विभागाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर अधिकार्‍यांचे पथक शनिवारी सकाळी तीन बॅगांसह रांची येथील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानातून निघाले. धीरज साहू यांच्या घरातून जप्त केलेल्या पिशव्या या दागिन्यांनी भरल्या होत्या, असे सांगितले जाते.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मद्य कंपनीशी कथितरित्या संबंध असणारे झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. रांची येथील त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी खासदार उपस्थित नसल्याचे सांगितले. धीरज साहू हे काँग्रेसचे नेते आहेत. ते झारखंडमधून राज्यसभेचे खासदार आहेत. धीरज साहू यांचे बंधू शिवप्रसाद साहू हेही खासदार होते. धीरज यांचे कुटुंब स्वातंत्र्यापासून काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे.