पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी सावध रहा!

तरुण भारत लाईव्ह न्यूज : ‘लम्पी त्वचा रोग’ हा गोवंश वर्गात होणारा विषाणूजन्य आणि संसर्गजन्य त्वचारोग आहे. हे विषाणू ‘कॅप्री पॉक्स’ या प्रवर्गातील असून शेळ्या-मेंढ्यातील होणाऱ्या देवी रोगाशी याचे साम्य आढळत असले तरी हा रोग शेळ्या-मेंढ्यांना होत नाही व या आजारापासून मनुष्याला सुद्धा धोका नाही. लंपी या रोगाची लागण देशी वंशांच्या गोवंशापेक्षा संकरीत जनावरांमध्ये होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा रोग सर्व वयोगटात होत असला तरी प्रौढापेक्षा लहान वासरात झाल्यास तीव्रता अधिक असते. हा आजार बाधित जनावरांपासून मनुष्यांना होत नसला तरी बाधित जनावरांच्या सानिध्यात आल्यास मनुष्यांद्वारे इतर सुदृढ जनावरांना होऊ शकते. या रोगात मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी जनावरांमध्ये अशक्तपणा येणे, जनावरांची कातडी खराब होणे, दुग्ध उत्पादनात घट होणे आणि कधी कधी गाभण जनावरांमध्ये गर्भपात होते ही लक्षणे दिसून येतात. परिणामी प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे आपल्या जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोग होऊ नये यासाठी सर्व पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे.

रोगप्रसार :

उष्ण व दमट हवामान या रोगास अनुकूल आहे. या रोगाचा प्रसार मुख्यत्व्ये बाह्य कीटक जसे की, गोचीड, चिलटे (Culicoides), चावणाऱ्या माश्या (Stomoxys), आणि डास (Aedes) यांच्या मार्फत होतो. तसेच सुदृढ जनावरे बाधित जनावरांच्या संपर्कात आल्यामुळे किंवा मनुष्यांद्वारे इतर जनावरांना हा रोग पसरण्यास मदत होते. विषाणूचे संक्रमण झाल्यानंतर 1 ते 2 आठवड्यापर्यंत हा विषाणू रक्तामध्ये राहतो (Incubation period) आणि त्यानंतर शरीराचा इतर भागही संक्रमित होतो. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी आणि तोंडातील लाळेतुन विषाणू बाहेर पडून चारा आणि पाणी दूषित होते. वीर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संयोगाद्वारे या रोगाचा प्रसार होऊ शकतो. तसेच गाभण जनावरांत रोग झाल्यास किंवा बाधित आईचे दूध पिल्याने सुद्धा वासरात या रोगाची लागण होते. नर वासरांना कमी दूध पाजत असल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यावर लंपी आजार होण्याची शक्यता जास्त असते.

लक्षणे :

1) सुरुवातीच्या काळात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा ताप येणे.
2) जनारांच्या डोळ्यातून किंवा नाकातून पाणी येणे, लसीका ग्रंथिंणा सूज येणे, डोळ्यावरील व्रणामुळे दृष्टी बाधित होते. पायांवर सूज आल्यामुळे जनावरे लंगडतात.
3) शरीरावर (डोके, मान, पाय, मायांग आणि कासेवर) 2 ते 5 सें.मी.च्या गाठी येतात. काही कालावधीनंतर या गाठी फुटून खपल्या पडून जखमा होतात आणि त्यामधून पस/पु बाहेर पडतो.
4) तोंडात, घशात, श्वसन नलिकेत आणि फुफ्फुसात पुरळ आणि फोड येतात, यामुळे जनावरांना चारा खाण्यास आणि पाणी पिण्यास अडचण जाते परिणामी भूक मंदावते आणि वजन कमी होऊन जनावरे अशक्त होतात.
5) गाभण जनावरांत गर्भपात तसेच कासेवर गाठी येऊन दुध उत्पादन कमी होते. कासेवर जखमा झाल्यास कासदाहचा धोका वाढतो.

घ्यावयाची काळजी :

1) या रोगाचे निदान झाल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच उपचार करावा.
2) सर्व प्रथम बाधित जनावरांचे सुदृढ जनावरापासून विलगीकरण/वेगळे (Quarantine) करावे. त्यांचा चारा आणि पाणी हे इतर जनावरे सेवन करणार नाही आणि ते इतर जनावरांच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
3) हा रोग बाह्य कीटक जसे की, गोचीड, चिलटे, चावणाऱ्या माश्या आणि डास यांच्या मार्फत होतो त्यामुळे दैनंदिन सकाळी व संध्याकाळी गोठ्याची व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छ्ता करणे तसेच पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी.
4) गोठ्याच्या आजूबाजूला तण वाढले असल्यास तणनाशकाची फवारणी करावी किंवा तण काढून घ्यावे त्यामुळे मच्छर/डासाचे प्रमाण कमी होते.
5) गोठा स्वच्छ करून सोडियम हायपोक्लोराईटच्या 2 ते 3% द्रावणाने निर्जंतुक करावा. यासोबतच अंगावरचे किटक नियंत्रण कण्यासाठी पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणानी जनावरे धुवून काढावी किंवा जैविक कीटकनाशकांची (निंबोळी तेल) फवारणी करावी.
6) जनावरांच्या अंगावर जखमा झाल्यास त्यावर कडुनिंबाच्या पानांचे अर्क, दाहनाशक आणि जंतुनाशक मलम लावावे.
7) जनावरांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे त्यांना संतुलित आहार देणे आवश्यक आहे.
8) पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बाधित जनावरांना उपचार करून घ्यावे.
9) रोगग्रस्त जनावरांचे मृत्यू झाल्यास जमिनीत पुरून योग्यरित्या विल्हेवाट लावावी.