जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर, कार्यालयावर CBI चा छापा

श्रीनगर : किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने गुरुवारी सकाळी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती घेतली. सीबीआयने दिल्लीत 30 ठिकाणी छापे टाकले आहेत. यापूर्वी सीबीआयने विमा घोटाळ्याप्रकरणी मलिक यांच्यावर कारवाई केली होती.

सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की, ते राज्याचे राज्यपाल असताना प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मंजूर करण्यासाठी त्यांना 300 कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली असल्याचा आरोप आहे. किश्तवाडमधील किरू जलविद्युत प्रकल्पासाठी 2,200 कोटी रुपयांचे नागरी कामाचे कंत्राट देण्यात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 2019 मध्ये हा छापा टाकण्यात आला होता.

सीबीआयने यापूर्वी सांगितले होते की, ‘वर्ष 2019 मध्ये किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट (HEP) च्या सिव्हिल कामाचे सुमारे 2,200 कोटी रुपयांचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयने गेल्या महिन्यात टाकलेल्या छाप्यात 21 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम याव्यतिरिक्त डिजिटल उपकरणे, संगणक, मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती.

केंद्रीय एजन्सीने चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स (प्रा.) लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी, माजी अधिकारी एमएस बाबू, एमके मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चौधरी हे जम्मू आणि काश्मीर केडरचे (आता AGMUT कॅडर) 1994 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.