जळगावात नवी दिल्लीतील सीबीआय पथक धडकले : दिवसभरात नोंदवले मविप्र प्रकरणातील संचालकांचे जाबजवाब

जळगाव : मविप्र संचालक अ‍ॅड.विजय भास्कर पाटील यांना धमकावून खंडणी वसुल केल्याप्रकरणी माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 31 जणांविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल होवून तो कोथरूडला वर्ग करण्यात आला होता तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित पेनड्राईव्ह बॉम्ब सभागृहात फोडल्यानंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सीबीआयकडे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासार्थ शुक्रवारी रात्री सीबीआयचे पथक जळगावात धडकले असून शनिवारी पथकाने नूतन मविप्र संस्थेच्या कार्यालयातून जावून माहिती घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिकार्‍यांच्या पथकाने निंभोर्‍यातील गुन्ह्याप्रकरणी शनिवारी दिवसभरात काही संचालकांचे जाब-जवाब नोंदवले. दरम्यान, पथकातील अधिकार्‍यांनी कुठलीही माहिती देण्यास असमर्थता दर्शवली.

असे आहे नेमके प्रकरण
मविप्र वादात भोईटे गटाला मदत करून मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड.विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलिसात केल्यानंतर गुन्हा दाखल होवून तो पुण्यातील कोथरूड पोलिस स्थानकात वर्ग करण्यात आला होता. संशयित आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावल्यानंतर शिविगाळ करत दमदाटी करण्यात आली तसेच सदाशीव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर मारहाण करीत गळ्याला आणि पोटाला चाकू लावून सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी घेतली उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. जानेवारी 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत ही घटना घडली मात्र उशिराने निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येवून तो पुण्यातील कोथरूड पोलिसात वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यात मंत्री महाजन यांच्यासह तानाजी भोईटे, रामेश्वर नाईक यांच्यासह 29 संशयितांचा समावेश आहे.

मविप्र संस्थेत घेतली माहिती
पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यासह डीवायएसपी, पोलीस निरीक्षक दर्जाचे प्रत्येकी एक अधिकारी आणि पाच कर्मचारी असे 11 अधिकार्‍यांचे पथक शुक्रवारी रात्री जळगावात आल्यानंतर त्यांनी शनिवारी सकाळी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त घेत मविप्र संस्थेच्या कार्यालयात जावून काही कागदपत्रांची माहिती घेतली तसेच काही संचालकांचे जाब-जवाबही नोंदवल्याचे समजते. सीबीआयचे पथक जळगाव धडकल्यामुळे राजकीय गोटात प्रचंड खडबड उडाली आहे. सीबीआयचे पथक जळगाव आल्याच्या वृत्ताला पोलिस सूत्रांनी देखील दुजोरा दिला आहे.

पेनड्राईव्ह बॉम्ब अन मविप्रचा गुन्हा
देवेंद्र फडणवीसांनी अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित पेनड्राइव्ह बॉम्ब सभागृहात फोडल्यानंतर मंत्री गिरीश महाजनांविरुद्ध केसेस कशा दाखल केल्या?, महाजनांना कसं फसवलं?, अगदी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कसं फसवायचं आहे? ह्या सर्व षडयंत्राचं चित्रीकरण पेन ड्राईव्हमध्ये असल्याचा दावा करीत सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी विधानसभेत केली होती तर सरकार बदलल्यावर हे प्रकरण हे सीबीआयकडे गेले शिवाय निंभोरा येथील गुन्ह्यातही मंत्री महाजन यांचे नाव असल्याने या अनुषंगाने सीबीआय पथक जळगावात आल्याची माहिती असून शनिवारी काही संचालकांचे जाबजवाब नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.