---Advertisement---
जळगाव : भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशात पोळा या सणाला महत्त्वाचे स्थान आहे. बळीराजाला समर्थपणे साथ देणाऱ्या सर्जा-राजाचा सण म्हणून हा सण ओळखला जातो. वर्षभर राबणाऱ्या सर्जा-राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी पोळा सणाची वाट पाहत असतात.
उद्या शुक्रवारी येऊन ठेपलेल्या पोळा सणामुळे गावागावांत मोठा उत्साह दिसून येत आहे. परंतु, यावर्षी या सणांवर लम्पी आजाराचे सावट जाणवत आहे. लम्पीच्या पार्श्वभूमीवर पोळा सण घरगुती पद्धतीनेच साजरा करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी घरगुती पद्धतीने पोळा सण साजरा करावा. लम्पी आजराचे गांभीर्य ओळखून आपापल्या घरीच बैलपूजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक जनावरे एकत्र आल्यास लम्पी रोग पसरण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी पारंपरिक आनंद घरच्या घरीच साध्या व सुरक्षित पद्धतीने साजरा करावा.
“आपल्या सर्वांच्या सहभागातूनच जनावरांचे आरोग्य जपले जाईल. लम्पीचा संसर्ग रोखणे ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे पोळा हा सण घरगुती वातावरणात, सुरक्षिततेची काळजी घेऊन साजरा करावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.