अहमदाबाद : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान पार पडलं. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता असून, सलग सातव्यांदा सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे आम आदमी पक्षही राज्याच्या राजकारणार प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष आहे. सुरुवातीला आलेल्या कलांनुसार, भाजपा १४२ जागांवर आघाडीवर असून ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. काँग्रेस २० तर आप सात जागांवर आघाडीवर आहे.
मतमोजणीला सुरुवात झाली असून तीन तासांनी भाजपा १४९ जागांवर आघाडीवर असून ५३.६ टक्के मतं मिळाली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस १९ जागांवर आघाडीवर असून फक्त २६.६ टक्के मतं मिळाली आहेत. आपला एकूण १२.८ टक्के मतं मिळाली असून फक्त नऊ जागांवर आघाडी आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल विजयी झाले आहेत. घटलोडियामधून भूपेंद्र पटेल यांनी विजय मिळवला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले गुजरातच्या जनतेचे आभार
अमित शाह यांच्या संघटनात्मक कौशल्य आणि जनतेने दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे गुजरातमध्ये भाजपा मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद मोदींनी भारताला स्वयंपूर्ण करण्याचा, जगातील सर्वोत्तम देश कऱण्याचा प्रयत्न केला असून जनकल्याण योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या. सरकार आणि संघटनेने केलेल्या कामामुळे हा मोठा विजय मिळाला आहे. मी गुजरातच्या जनतेचे आभार मानतो असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
राहुल गांधींच्या मदतीला धावले संजय राऊत
निकालानंतर प्रतिक्रिया देतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडू नये असं मला वाटतं. राहुल गांधी वेगळ्या मिशनवर आहेत. या निवडणुकांचा संदर्भ त्यांच्या यात्रेशी जोडणं चुकीचं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काँग्रेस अंतर्गत आणि इतर राजकारणापासून राहुल गांधी दूर आहेत. ते एक वेगळी मोहिम पुढे नेत आहेत. देश जोडणं, देशातील द्वेष नष्ट करणं, लोकांची मनं जोडणं, संघर्ष थांबवणं यासाठी ती यात्रा आहे आणि त्याला चांगलं यश मिळत आहे, असंही ते म्हणाले.