नवी दिल्ली । केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला. केंद्र सरकारने ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. बांगलादेश, श्रीलंका, भुतान, बहरैन, युएई आणि मॉरिशस सहा देशांमध्ये कांदा निर्यात केली जाणार आहे.
दरम्यान, एक दिवसापूर्वी केंद्राने गुजरातमधील २००० मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली होती. यावरून देशभरातील आणि महाराष्ट्रातील शेतकरी केंद्र सरकारवर नाराज झाले होते. सरकारवर चहुबाजूंनी टीका केली जात होती. अशातच सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.
अशी होणार निर्यात
सहा देशांमध्ये कांदा निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत करण्यात येणार आहे. एनसीईएल स्पर्धात्मक किमतीत ई-प्लॅटफॉर्मद्वारे देशातील शेतकऱ्यांकडून कांदा घेणार आहे. एनसीईएल त्यासाठी 100 टक्के आगाऊ पेमेंट देणार आहे. सध्या असलेल्या बाजारभावानुसार हा कांदा घेतला जाणार आहे. ९९ हजार १५० मेट्रीक टन कांद्यासह दोन हजार मेट्रीक टन कांदा निर्यात करण्यात येणार आहे.