नवी दिल्ली : अलीकडच्या काही दिवसांमध्ये एआयचा गैरवापर करून सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ व्हायरल केले जाताहेत. मध्यंतरी अभिनेत्री रश्मिका मंधान चा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. या तंत्रज्ञानाचा वाढता धोका पाहता केंद्र सरकार लवकरच कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अनेक सोशल मीडिया कंपन्यांसोबत बैठक घेतली. डीपफेक फक्त समाजासाठीच नाही, तर लोकशाहीसाठीही मोठा धोका असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पत्रकार परिषदेत अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, डीपफेक मोठा सामाजिक धोका असल्याचे कंपन्यांनी मान्य केले आहे. हे टाळण्यासाठी सरकार आणि कंपन्या कोणत्या मुद्द्यांवर काम करतील याचाही केंद्रीय मंत्र्यांनी उल्लेख केला. 1-डीपफेक कसे तपासायचे? 2-ते व्हायरल होण्यापासून कसे रोखायचे? 3-युजर त्याची तक्रार कुठे करू शकतो आणि त्यावर त्वरित कारवाई कशी केली जाईल? 4-त्याच्या धोक्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी सर्वजण एकत्र कसे कार्य करू शकतात? या चार गोष्टींवर प्रामुख्याने चर्चा झाली.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, अशा व्हिडिओंची चौकशी करण्यासाठी काही प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत, परंतु आम्हाला यापेक्षा जास्त गरज आहे. अशा व्हिडिओंविरोधात लवकरच कायदा करण्यात येईल आणि योग्य तांत्रिक पावले उचलली जातील. या मुद्द्यावर आणखी अनेक बैठका होतील. या विषयावर पुढील बैठक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या बैठकीत आढावा घेऊन पाठपुरावा केला जाईल. जो कोणी डीपफेक व्हिडिओ प्रसारित करेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.