तरुण भारत लाईव्ह I नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरण विभागाने मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांवर घेतल्या जाणार्या ७४ औषधांचे दर निश्चित केले आहेत. यामुळे या आजाराच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहावे यासाठी घेतल्या जाणार्या आणि मधुमेहावरील एका टॅब्लेटची किंमत २७.७५ रुपये असेल अशी घोषणा करण्यात आली. तसेच उच्च रक्तदाबावर उपयुक्त असलेल्या औषधांची किंमतही कमी करण्यात आली आहे. या औषधांच्या एका टॅब्लेटसाठी ग्राहकांकडून १०.९२ रुपये आकारले जाणार आहे. प्राधिकरण विभागाने ८० अधिसूचित केलेल्या औषधांच्या दरांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. न्युट्रोपेनिया आणि एपिलेप्सी अशा आजारांवर उपचार म्हणून दिल्या जाणार्या औषधांचाही या यादीमध्ये समावेश आहे.
सरकारच्या या विभागाद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये तयार होणार्या औषधांचे दर निश्चित करणे, त्यांमध्ये सुधारणा करणे तसेच देशभरात योग्य दरात औषधे उपलब्ध करुन देणे अशी कामे केली जातात. केलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे, औषधांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे यांसारख्या कामांमध्येही हा विभाग सक्रिय असतो.