---Advertisement---
शेंदुर्णी (ता. जामनेर) : संचालक मंडळाला सोबत घेऊन सभासद व ग्राहकांनी सहकार्य केल्यास ‘पाचोरा पीपल्स’ लवकरच शेड्यूल्ड बँकेत रूपांतराचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही चेअरमन व होऊ घातलेल्या निवडणुकीचे सहकार पॅनलचे प्रमुख अॅड. अतुल संघवी यांनी दिली. येथील पारस जैन बहुउद्देशीय सभागृहात सोमवारी (७ जुलै) झालेल्या सभासद मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागरमाल जैन अध्यक्षस्थानी होते.
व्यासपीठावर सहकारमहर्षी उत्तमराव थोरात, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड, पारस जैन पतसंस्थेचे चेअरमन शांतिलाल जैन, संचालक प्रकाश झंवर, पंडित दीनदयाल उपाध्याय पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे, पाचोरा पीपल्स बँकेचे व्हॉइस चेअरमन व उमेदवार सीए प्रशांत अग्रवाल, बँकेच्या शाखास्तरावर सहकार पॅनलचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार संचालक पवन अग्रवाल आदींसह सहकार पॅनलचे उमेदवार व इतर राखीव गटातून या पॅनलचे बिनविरोध विजय झालेले उमेदवार उपस्थित होते.
याप्रसंगी सहकारमहर्षी व बँकेचे माजी व्हॉइस चेअरमन राजमत अग्रवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वैयक्तिक सहकार गीत ज्येष्ठ कार्यकर्ते वामनराव फासे यांनी म्हटले अॅड. सांगवी म्हणाले की, पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत सभासदांना दिलेला शब्द या पाच वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेची निवडणूक एका जागेसाठी लादली गेली बँकेच्या १५ संचालक मंडळाच्या जागांपैकी आमचे सहा संचालक बिनविरोध झाले आहेत. नऊ जनरल जागांविरोधात एकच उमेदवार उभा असल्याने निवडणुकीला सामोरे जावे लागले. संस्थेच्या सभासदांना आमच्या कामाची पारदर्शकता व विश्वास असल्याने बँकेत आमची एकहाती सत्ता येणार, यात शंका नाही. आगामी काळात राहिलेले बँकेच्या विस्तारासाठी पुन्हा सेवेची संधी द्या, अशी साद त्यांनी सभासदांना घातली. या वेळी संजय गरुड यांनी मनोगतातून बँकेच्या कामकाजाचे व संचालक मंडळाचे कौतुक केले. सागरमाल जैन यांनी स्वअनुभवावरून बँकेची प्रगती व काम करणाऱ्या संचालक मंडळाबद्दल गौरवोद्गार काढले.
सहकारमहर्षी उत्तमराव थोरात यांनी प्रास्ताविकात सहकार व बैंक कर्जदाराची भूमिका, कामकाज करताना संचालक मंडळाला येणाऱ्या अडचणी यांची माहिती देऊन पीपल्स बँकेच्या कार्याचा विस्तार आजच्या आर्थिक मंदीच्या काळातही संचालक मंडळांनी टिकवून ठेवून बँकेची प्रगती करीत आहेत, ही जमेची बाजू असल्याचे सांगितले. बँकेचे व्हॉइस चेअरमन सीए प्रशांत अग्रवाल यांनी बँकेच्या आर्थिक बाजू मांडून, उमेदवारांचा परिचय करून दिला. बँकेचे बिनविरोध निवडून आलेले संचालक शेंदुर्णीचे पवन अग्रवाल यांनी आभार मानले. मेळाव्याला बहुसंख्य सभासद व हितचिंतक उपस्थित होते.