Chalisgaon : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग द्वारा (एडीआयपी) योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिंम्को) कानपूर यांच्यामार्फत,राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनातून व खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील पूर्व तपासणी व नोंदणी झालेल्या 255 दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वितरीत करण्यात आली . दिव्यांग बांधवांना मिळालेल्या उपकरणातून त्यांच्या परावलंबी जीवनातून दिलासा मिळणार असल्याचा आनंद आहे अशी भावना उमंग सृष्टी परिवाराच्या अध्यक्षा संपदा उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आज चाळीसगांव येथील अंधशाळेच्या प्रांगणात साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी संपदा पाटील बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर उमंग सृष्टी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्ष संपदा पाटील, पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे, उपसभापती सुनील पाटील, दिव्यांगांच्या आधारस्तंभ मीनाक्षी निकम, एलिमकोचे डॉ.किरण पावरा, जि.प.समाज कल्याण अधिकारी भरत चौधरी ,जिल्हा अपंग अधिकारी गणेश कर , भाजपा दिव्याग आघाडीचे तालुका अध्यक्ष पुंडलिक पाटील, प्रहार तालुकाध्यक्ष रत्नाबाई पाटील,दिव्यांग सामाजिक कार्यकर्त्या भारती चौधरी,पंचायत समिती सदस्य रवी चौधरी, तालुका सरचिटणीस गिरीश ब-हाटे ,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, गुलाब पाटील, आयटी सेलचे शुभम सुराणा, देवेश पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जि. प . समाज कल्याण अधिकारी भरत चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले खासदार उन्मेश पाटील यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी 9 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या पूर्व तपासणी शिबिरात ज्या ज्या दिव्यांग बांधवांची नोंदणी केली होती. त्याच दिव्यांग बांधवांना आज 255 तिन चाकी सायकल, कर्णयंत्र, अंध बांधवांना स्मार्ट फोन, सेन्सर काठी, व्हील चेअर, कुबडी,काठी आदी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.
दिव्यांग बांधवांच्या आधारस्तंभ मिनाक्षी निकम यांनी परखड मत व्यक्त केले त्या म्हणाल्या की दिव्यांग बांधवांनी मिळालेल्या उपकरणातून स्वावलंबी होण्यासाठी पुढे यावे. शासन, प्रशासन, तसेच खासदार उन्मेश सारखा संवेदनशिल लोकप्रतिनिधी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असून खासदार उन्मेश आणि संपदा पाटील यांनी सातत्याने दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम, शिबीर राबवून त्यांच्या पाठीवर मायेचा फिरविला आहे.आज 255 सायकलीसह विविध साहित्य मिळवून दिल्याबद्दल खासदार उन्मेश यांचे मी आभार व्यक्त करते.
याप्रसंगी संपदा पाटील यांच्या हस्ते रवींद्र वेळीस, रमेश राठोड, निंबा आहिरे,निंबाबाई पाटील यांना सायकलीचे, सरदार वाघ,अर्जुन मोरे यांना स्मार्ट फोन तसेच विजय राजपूत यांना श्रवण यंत्राचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन अर्जून परदेशी यांनी तर तालुका अध्यक्ष पुंडलिक पाटील यांनी आभार व्यक्त केले.
दीव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान
यावेळी दिव्यांग भगिनी निंबाताई पाटील म्हणाल्या की गेल्या वर्षभरापूर्वी पूर्व तपासणी शिबीर झाले होते.त्यामुळे साहित्य कधी भेटेल ही उत्सुकता होती. वेळोवेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांना मी फोन करून विचार होते. त्यांनी विश्वास दिला होता की तुमची तपासणी झाली आहे. तुम्हाला साहित्य लवकरच मिळेल आज हे साहित्य मिळाल्याने मी खासदार उन्मेश पाटील यांचे आभार व्यक्त करते.यावेळी विविध साहित्य घेताना दिव्यांग बंधू, भगिनी, त्यांच्या पालकावरच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.