---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील बोढरे फाटा परिसरात महामार्ग पोलिसांनी मध्यरात्री दरम्यान मोठी कारवाई केली. तपासणीसाठी थांबवलेल्या ब्रेझा कारमध्ये ३९ किलो अॅम्फेटामाइन हा अत्यंत घातक अमली पदार्थ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार किंमत ४० ते ५० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
ही कार दिल्लीहून बेंगळुरूकडे जात होती. महामार्ग पोलीस चौकीजवळ ही गाडी थांबवून तपासणी केली असता, गाडीच्या विविध भागांमध्ये अमली पदार्थ लपवलेले आढळून आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार याआधीही गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. यामुळे हा रेकॉर्डेड ड्रग्ज तस्कर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी स्वतः मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले. तर आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून माहिती दिली असून, या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली माहिती
अंमली पदार्थांचा पुरवठा वाढवून त्यामाध्यमातून देशातील तरुण पिढीला व्यसनाधीन करणे व देश खिळखिळा करण्याचे काम देशाचे शत्रू करत आहेत. सदर कारवाईबाबत तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना माहिती दिली असून याचा सखोल तपास करण्याची विनंती केली आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक जळगाव डॉ.महेश्वर रेड्डी यांनीदेखील या कारवाईची गांभीर्याने दखल घेतली असून पुढील तपास युद्धपातळीवर सुरू आहे. ड्रग्जमुक्त महाराष्ट्र या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पाला बळ देणारी ही कारवाई असून सर्व पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करतो.
– आमदार मंगेश रमेश चव्हाण