T20 विश्वचषक 2024 संपला असून, आता ICC ने आपल्या पुढील स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. आयसीसीची पुढची स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. ज्याचे आयोजन पाकिस्तानमध्ये आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोणतीही कमतरता राहू देऊ इच्छित नाही. पीसीबीने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथील स्टेडियमची दुरुस्ती सुरू केली आहे. आयसीसीकडे वेळापत्रकाचा प्रस्तावही पाठवण्यात आला असून, या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानात यावी यासाठी पीसीबी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, बीसीसीआयने मोठा धक्का दिला असून, त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टेन्शनमध्ये आहे.
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही ?
भारतीय संघाचा क्रिकेटमध्ये मोठा दर्जा आहे आणि तो जिथेही स्पर्धेत खेळतो, तिथे पैसे कमावण्याची मोठी संधी असते. संकटातून जात असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ही संधी वाया घालवायची नाही. त्यामुळेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला यावी यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे बीसीसीआयची समजूत काढण्यासाठी त्यांनी एकच ठिकाण देऊ केले. असे असूनही बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवू इच्छित नाही. स्पोर्ट्स टॅकने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, परंतु तेथे जाण्याची फारशी आशा नाही. याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारवर अवलंबून असेल.
टीम इंडियाला पाकिस्तानात का जायचे नाही ?
टीम इंडिया पाकिस्तानला न जाण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे दोन्ही देशांमधील संबंध. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वर्षांपासून तेढ आहे. भारतातील पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांमुळे केंद्र सरकारने सर्व संबंध संपवण्याचा निर्णय घेतला होता. भारत सरकारला खेळाडूंच्या सुरक्षेची काळजी आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. 2008 पासून भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. गेल्या 16 वर्षात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच मालिका खेळली गेली आहे, जी 2012-13 मध्ये झाली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसीसमोर हायब्रीड मॉडेलचा मुद्दा ठेवण्यात आल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. श्रीलंकेत होणाऱ्या बैठकीत आयसीसी या प्रकरणी निर्णय घेईल. बीसीसीआयची मागणी मान्य झाल्यास टीम इंडियाचे सामने तटस्थ ठिकाणी होतील आणि पीसीबीला वेळापत्रकात बदल करावा लागू शकतो. आशिया चषक 2023 चे आयोजनही पाकिस्तानला करायचे होते, परंतु बीसीसीआयच्या मागणीनंतर भारताचा सामना श्रीलंकेत हायब्रीड मॉडेलनुसार खेळवण्यात आला.