चॅम्पियन्स ट्रॉफीवर मोठी बातमी, ‘या’ देशात होऊ शकतात टीम इंडियाचे सामने !

भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली नुकताच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आणि आयसीसी स्पर्धेतील ११ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला. आता भारतीय संघ पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी सज्ज होत आहे आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल अशी सर्वांना आशा आहे. पण, या ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का ? हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आता मिळाले आहे. BCCI ने भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्याच्या त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नसल्याचे BCCI च्या सूत्राने ANI ला सांगितले आहे. आशिया चषक स्पर्धेच्या वेळेस हाच प्रश्न उद्भवला होता आणि त्यावेळी बीसीसीआयचा हायब्रिड मॉडेल मान्य केला गेला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आकांडतांडव करूनही काहीच उपयोग झाला नव्हता. हीच परिस्थिती चॅम्पियन्स ट्रॉफीत दिसतेय.

दोन्ही देशांतील राजकीय संबंध पाहता टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही आणि त्यामुळे BCCI ने त्यांचे सामने श्रीलंका किंवा दुबईत खेळवण्याचा प्रस्ताव ICC ला दिला आहे. बीसीसीआयचे क्रिकेटमधील वर्चस्व पाहता तो मान्य केला जाण्याची शक्यता आहे.