Champions Trophy 2025 Final Result : क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर अखेर टीम इंडियानं आपलं नाव कोरलंय. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियानं तब्बल 12 वर्षांनंतर ही मालिका जिंकली. मात्र, पुरस्कार वितरण सोहळ्याला स्पर्धेचा यजमान असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून कोणीच हजर नव्हतं. आता यामागचं कारण पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम यांनी सांगितलं आहे.
टीम इंडियानं न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 9 महिन्यांत दुसरी ट्रॉफी जिंकली आहे. विशेषतः टीम इंडियानं 25 वर्षांपूर्वी याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे.
काय म्हणाला वसीम अक्रम ?
वसीम अक्रमने दिलेल्या माहितीनुसार, पीसीबी चेअरमन मोहसिन नकवी यांची तब्येत बरी नसल्याने ते फायनलसाठी दुबईत पोहोचू शकले नाही. अक्रमने स्पोर्ट्स सेंट्रल नावाच्या यू-ट्यूब चॅनलशी बोलताना ही माहिती दिली. वसीम अक्रमने हे स्पष्ट केलं की, “पीसीबीकडून त्यांचे दोन अधिकारी सुमेर अहमद आणि उस्मान वाला तिथे हजर होते. ते स्टेजवर का गेले नाहीत? हे माहित नाही असं त्याने सांगितलं”
शोएब अख्तरनेही उपस्थित केला प्रश्न
याआधी शोएब अख्तरने फायनल प्रेजेंटेशन सेरेमनीच्यावेळी पीसीबी चेअरमन किंवा अन्य कोणी अधिकारी तिथे उपस्थित नव्हता, यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. हे समजण्यापलीकडे आहे असं तो म्हणाला. “वर्ल्ड स्टेजच्या सामन्यामध्ये असं होणं ही विचार करण्यासारखी बाब आहे. त्यांनी स्टेजवर असायला पाहिजे होतं” असं शोएब अख्तर म्हणाला.