‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस, गारपीटीची शक्यता; असा आहे हवामान खात्याचा अंदाज

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे, गारपीट आणि पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालंय. अशातच मार्च महिन्याच्या १ आणि २ तारखेला अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये पाऊस व काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा तसंच नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय ढगांच्या गडगडाटांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे,  सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागात ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 2 मार्चपर्यंत ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा व वादळी वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात 2 दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे.