राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

तरुण भारत लाईव्ह ।१९ मार्च २०२३। राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिठांचा पाऊस पडत आहे. मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. दरम्यान राज्यामध्ये पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

वादळी पावसाचा इशारा देत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. 20 मार्चपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात 20 मार्चपर्यंत विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता अधिक जाणवत आहे. तर मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.