चंद्रयान- ३ चा सॉफ्ट लैंडिंग सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक उत्सुक होता. लैंडिंग होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
इस्रोने एक्स(पूर्वीचे ट्विटर) वर संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रयान- ३ च्या वतीने, “भारत, मी चंद्रावर पोहोचलो आणि तुम्हीही’ असे लिहून मिशन यशस्वी झाल्याची घोषणा केल्यावर तासाभरात ट्विटरवर तब्बल २९ ट्रेंड पाहायला मिळाले.
यावेळी एकाहून एक मजेशीर मीम्सही बघायला मिळाले. अभिनेता नवाजउद्दीन सिद्दिकीच्या फोटोसह ‘चांद पर है अपुन’ हे मीम तुफान व्हायरल झाले. रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर पृथ्वी चांदोमामाला राखी बांधत असल्याचा फोटोही लक्षवेधी ठरला.
२०१९ मध्ये चंद्रयान २ मोहीम अयशस्वी ठरली आणि भारताचा क्रिकेट संघही वर्ल्ड कपबाहेर गेला, तर आता २०२३ मध्ये मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारतही यंदाचा वर्ल्ड कप जिंकणार का… असे मुंबई इंडियन्सने केलेले मीम आणि दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा ‘अशीही बनवा बनवी’ सिनेमातील चंद्रकोरीवर बसलेल्या फोटोनेही खळखळून हसवले. त्याचवेळी, अभिनेते प्रकाश राज यांना अनेकांनी ट्रोलही केले.