सोलापूर : भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवेढ्यातील एका सभेत बोलताना धक्कादायक वक्तव्य केलंय. २०१९ मध्ये सरकार गेले, मी त्यावेळी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्यानंतर ३३ महिने आम्ही काय सहन केले हे आम्हाला माहिती आहेत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती, असं त्यांनी विधान केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
माढा येथे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, फडणवीसांना अटक होणार होती. पण मला खात्री होती हे देखील दिवस जातील आणि चांगले दिवस येतील. त्यामुळे चांगले काम करत राहा. चांगल्या कामाचे चांगले फळ मिळते. चंद्रकांत पाटलांच्या या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनीही दुजोरा दिला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कटकारस्थान होत होते, त्या लोकांनी प्रयत्न खूप केले. पण सापडत काही नव्हतं. खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न केला. अनेक गोष्टी केल्या. त्याबाबत सविस्तर पुन्हा कधी बोलू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
याआधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असा दावा केला होता, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या अटकेसाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करत होते. त्या योजनेचा मी साक्षीदार आहे असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं होतं. तर मविआ काळात मला तुरुंगात टाकण्याचा कट आखला होता. हे काम तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले गेले होते. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा. आत टाका असं वरिष्ठांनी पोलिसांना सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.