---Advertisement---

Chandrakant Patil : ‘जादूच्या कांडीने’, दिल्ली निकालावरून चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांना टोला

---Advertisement---

कोल्हापूर : ‘काँग्रेस व आम आदमी पक्षाला एकत्र येण्यास कोणी अडवले होते का? शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संजय राऊत इतके महान नेते आहेत की, ते त्यांच्यात समझोता घडवू शकले नाहीत. त्यांना जादूच्या कांडीने निकाल मिळतात, असे वाटत असेल, तर त्यांनी रोज सकाळी माध्यमांशी बोलण्यापूर्वी साधना करावी’, असा टोला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे लगावला. ते आज शिवाजी विद्यापीठातील भुयारी मार्गाच्या उद्‌घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधत होते.

मंत्री पाटील पुढे म्हणाले, ‘शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा न देता ‘आप’ला दिला, तेथेच मोठी ठिणगी पडली आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीतून बाहेर पडेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. उद्धव ठाकरे यांची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेवर स्पष्टीकरण

चंद्रकांत पाटील यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भातही भाष्य केले. ‘या योजनेतून पाच लाख महिलांची नावे कमी करण्यात आली आहेत. चारचाकी असलेल्या, प्राप्तिकर भरणाऱ्या आणि पात्र नसलेल्या महिलांचा त्यात समावेश आहे. मात्र, एकाही महिलेकडून आधी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

नोकरीच्या संधी वाढणार

राज्यातील नोकरभरतीबाबत बोलताना पाटील म्हणाले, ‘जे २०१७ ते २०२५ दरम्यान निवृत्त झाले आहेत, त्या जागांवर किमान भरती केली जाणार आहे. त्यामुळे तीन ते चार हजार नेट-सेट पात्र उमेदवारांना नोकरीच्या संधी मिळतील.’

मोदींवर वाढता विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीही चंद्रकांत पाटील यांनी आपले मत मांडले. ‘मोदी यांच्यावर सामान्य नागरिकांचा विश्वास वाढला आहे. लोकसभेत झालेली चूक नागरिकांनी विधानसभेत दुरुस्त केली असून, मोदींचा करिष्मा अद्याप संपलेला नाही आणि पुढेही संपणार नाही. भाजपला दिल्लीमध्येही स्पष्ट बहुमत मिळेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासंदर्भात काही आकडे मांडले आहेत. यावर निवडणूक आयोग योग्यवेळी उत्तर देईल, असेही पाटील यांनी सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment