Chandrasekhar Bawankule : उद्धव ठाकरेच कलंकित करंटा माणूस, ठाकरेंच्या टीकेचा खरपूस घेतला समाचार

Maharashtra Politics : कर्तृत्व शून्य असलेले उद्धव ठाकरे कलंकित करंटा माणूस आहे, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आजच्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ठाकरे यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे कर्तृत्व शून्य असलेली व्यक्ती आहे. कोरोना काळात त्यांनी महाराष्ट्राला अंधारात ठेवले. कमिशन न मिळाल्याने त्यांनी मुंबईतील मेट्रोचे प्रकल्प बंद ठेवले. अडीच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी काहीच काम केले नाही. ठाकरेंची कारकिर्द म्हणजे त्यांचे वडील आहेत. बाकी त्यांचे कर्तृत्व शून्य आहे. ठाकरे एक कलंकित मुख्यमंत्री होते. त्यांचा सीएम पदाचा काळ कलंकित होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना ठाकरे यांनी साथ दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते कलंकित आहेत, यापुढे ते पुन्हा असे बोलले, तर जोडे मारू, अशा शब्दांत बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस वयाच्या २९ व्या वर्षी आमदार झाले. ते मेहनत घेऊन स्वकर्तृत्वावर मुख्यमंत्री झाले, असेही बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले आहे. भाजपमध्ये यावरून ठाकरे विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. गडकरी म्हणतात, देवेंद्र यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही.’ असा सल्ला देत नितीन गडकरी यांनी ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे.