नागपूर : महाराष्ट्रासह देशात ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती मोठ्या उत्साहत साजरी करण्यात आली. तेसेच येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमीत्ताने लावण्यात आलेल्या एका पोस्टरवरून नवा वाद सुरू झाला आहे. दरम्यान, आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती आहे. जगभरात मोठ्या उत्साहात बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतो. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक नेते शुभेच्छा देत असतात. मात्र, नागपूर जिल्ह्यातील असाच एक जयंतीच्या शुभेच्छा देणारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बॅनर वादग्रस्त ठरला आहे.
या बॅनरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा बावनकुळेंचा मोठा फोटो असल्याचे दिसत आहे. या बॅनरमुळे अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाने दिले स्पष्टीकरण
नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे भाजप कार्यकर्त्यांनी श्री हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तेथील रहिवासी मेघराज बेलेकर यांच्या घरावर फ्लेक्स बॅनर लावले होते. हे बॅनर समाजमाध्यमावर व्हायरल झाले.
हा प्रकार लक्षात येताच बॅनर काढण्यात आले. सोबतच बॅनरवर नावे लिहून प्रसिद्धीचा प्रयत्न करणाऱ्या पाच व्यक्तींनी जाहीर माफीनामा लिहिली आहे. ही चूक आमच्याकडून झालेली आहे याकरीता सर्व सदस्यांसह माफी मागतो असा माफीनामा जाहीर केला आहे. या प्रकरणाशी भाजपा व भाजपा प्रदेशाध्यक्षांचा कोणताही संबंध नाही हे घटनाक्रमावरून लक्षात येते.