भारताची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम असलेल्या चांद्रयान-३ ने आज एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला आहे. सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास चांद्रयानाने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला. १४ जुलै रोजी ‘चांद्रयान-३’ने अवकाशात झेप घेतली होती. त्यानंतर आता २२ दिवसांनी ते चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे.
चांद्रयान-३ ने चंद्राच्या दोन तृतीयांश अंतर कापले आहे आणि आता मोहीम एका गंभीर टप्प्यात दाखल झाली आहे, ज्यामुळे त्यावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. त्याच वेळी, सर्वकाही त्याच्या वेळापत्रकानुसार सुरळीत सुरू आहे. बेंगळुरूमधील ISRO टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (ISTRAC) ने लूनर ऑर्बिट इंजेक्शन केले आहे, याचा अर्थ अवकाशयान चंद्राच्या कक्षेत ठेवण्यात आले आहे.
काय असणार पुढील वाटचाल?
यानंतर आता चांद्रयान-३ हे चंद्राभोवती एक फेरी मारेल. उद्या (6 ऑगस्ट) रात्री ११ वाजेच्या सुमारास चांद्रयानाला चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत ढकलण्यात येईल. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी तिसऱ्या, १४ ऑगस्टला चौथ्या आणि १६ ऑगस्टला पाचव्या कक्षेत ढकलण्यात येईल. १७ ऑगस्ट हा अतिशय महत्त्वाचा दिवस असेल. या दिवशी चंद्राच्या १०० किलोमीटर कक्षेमध्ये चांद्रयानाला पोहोचवण्यात येईल. पुढे २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल.
ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर लँडिंग करणारा भारत चौथा देश ठरणार आहे. तर, चंद्राच्या दक्षिण भागात लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरेल. त्यामुळे देशासाठी ही मोहीम अगदी ऐतिहासिक आहे.