शिर्डी : भारताची चांद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग व्हावे यासाठी देशभरात प्रार्थना करण्यात येत होत्या. मात्र चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणापूर्वी १ जुलैला इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी शिर्डीमध्ये येवून साईबाबांच्या चरणी चांद्रयान ३ ची प्रतिकृती साईचरणी ठेवून पूजा केली होती, अशी माहिती समोर आली आहे.
चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणापूर्वी १ जुलैला प्रोजेक्ट मॅनेजर वीर मुथुवेल व असिस्टंट प्रोजेक्ट डायरेक्टर के. कल्पना यांनी शिर्डीत येऊन पूजा केल्याचे शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवा शंकर यांनी आता सांगितले. मोहीम यशस्वी झाल्यानंतर शिर्डीत जल्लोष करण्यात आला. तसेच संस्थानतर्फे अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्यावेळी सिवा शंकर यांनी ही माहिती उघड केली. याची छायाचित्रेही सादर करण्यात आली.
या मोहिमेपूर्वी शास्त्रज्ञांची गोपनीय शिर्डी भेट उघड करण्यात आली. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवा शंकर यांनीच ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणापूर्वी त्याचे प्रोजेक्ट मॅनेजर वीर मुथुवेल व असिस्टंट प्रोजेक्ट डायरेक्टर के. कल्पना यांनी शिर्डीला येऊन साईबाबा समाधी मंदिरात साईबाबांचे दर्शन घेतले होते.
चंद्रयान ३ ची प्रतिकृती साईचरणी ठेऊन पूजा केली होती. साई संस्थानकडून यावेळी वीर मुथुवेल यांच्याकडे साईबाबांचा प्रसाद देऊन चंद्रयान ३ चे यशस्वी प्रक्षेपण होण्यासह त्याचे यशस्वी लँडिंग व्हावे, यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या होत्या, असेही सिवा शंकर यांनी सांगितले.