Chandrayaan 3 Mission: भारताची महत्वाकांक्षी मोहिम असलेलं चांद्रयान यशस्वीरित्या ३ लॉन्च करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन हे २.३५ मिनिटांनी लॉन्च झालं. अवघ्या देशाचं याकडं लागलं होतं. एलएमव्ही-३ या रॉकेटचा वापर करुन हे यान लाँच करण्यात आलं. २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्रावर लँड होईल.
एएनआयच्या माहितीनुसार, चांद्रयान ३ विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे. या यानाचं वजन ३,९०० किलो इतकं आहे. यातील मॉड्यूलचं वजन २,१४५.०५ किलो आहे. तर १,६९६.३९ किलो केवळ इंधन असणार आहे.या यानानं अवकाशात झेप घेतल्यानंतर त्याचे काही भाग वेगळे झाले आणि मुख्य भागानं चंद्राकडं आगेकूच केली. यावेळी सतीश धवन केंद्रात केंद्र सरकारचे अनेक मंत्री उपस्थित होते. अवघ्या देशानं हा सोहळा टीव्हीवर लाईव्ह पाहिला.
या मोहिमेच्या माध्यमातून भारत चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास, चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरेल. तर, चंद्राच्या दक्षिण भागात उतरणारा जगातील पहिलाच देश ठरण्याचा मान भारताला मिळणार आहे.
आज लाँच झाल्यानंतर चंद्रावर पोहोचण्यासाठी चांद्रयान-३ ला सुमारे ४० दिवसांचा कालावधी लागेल. सर्व काही सुरळीत पार पडल्यास २३ किंवा २४ ऑगस्ट या दिवशी चांद्रयान चंद्रावर उतरेल. काही अडचणी आल्यास, या तारखा बदलूही शकतात असं इस्रोने स्पष्ट केलं आहे.
चांद्रयान-२ मोहिमेदरम्यान विक्रम लँडर प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतानाच क्रॅश झालं होतं. त्यामुळं, आता चांद्रयान ३ मोहिमेत हे लँडर सुरक्षितपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणे हे सर्वात मुख्य लक्ष्य असणार आहे. चांद्रयान-३ मधील लँडरला विक्रम आणि रोव्हरला प्रज्ञान असं नाव देण्यात आलं आहे.