भारत आज घेणार चंद्राकडे झेप

श्रीहरीकोटा : Chandrayaan-3 इस्रो तिसर्‍या चंद्र मोहिमेसाठी सज्ज असून, चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तालीम पूर्ण झाल्याची माहिती इस्रोने दिली आहे. इस्रोचे चांद्रयान-3 अंतराळयान शुक्रवारी दुपारी 2.35 मिनिटांनी आंध‘ प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. चांद्रयान-3 हा इस्रोच्या चंद्रमोहिमेतील तिसरा टप्पा आहे. याआधी चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 प्रक्षेपित करण्यात आले होते. चांद्रयान-2 द्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा चांद्रयान-3 द्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न असणार आहे.

चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चा पुढचा टप्पा आहे. सप्टेंबर 2019 मध्ये चांद्रयान-2 प्रक्षेपित करण्यात आले होते. पण, ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अयशस्वी ठरले. चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर क‘ॅश झाले. त्यामुळे आता इस्रो चार वर्षानंतर पुन्हा एकदा चंद्र मोहिमेसाठी सज्ज झाले आहे.Chandrayaan-3 चांद्रयान-3 चे एकूण वजन 3,900 किलो आहे. या मोहिमेसाठी सुमारे 615 कोटी रुपये खर्च आला आहे. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचा वापर केल्याने चांद्रयान-3 चा खर्च तुलनेने कमी झाला आहे. चांद्रयान-2 मोहिमेसाठी 960 कोटी रुपये तर, चांद्रयान-1 साठी 386 कोटी रुपये खर्च आला होता. चांद्रयान-3 अंतराळयान 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लॅण्डिंग करण्याची अपेक्षा आहे.