लँडिंगसाठी चांद्रयान चंद्रावर शोधतंय जागा; इस्रो म्हणाले…

श्रीहरीकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. काल इस्रोने एक पोस्ट करत ‘चांद्रयान-3’च्या लँडिंगची तारीख अन् वेळ सांगितली आहे. दि. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी हे लँडिंग होईल. सध्या चांद्रयान-3 सुस्थितीत असून, लँडिंगसाठी विक्रम सज्ज असल्याचंही इस्रोने स्पष्ट केलं. चंद्रावर लँडिंग करण्यासाठी चांद्रयान एक सुरक्षित जागा शोधत आहे.

चांद्रयान-३ लक्ष्याच्या जवळ पाहोचलेलं असून सध्या ते लँडिंगसाठी जागा शोधत आहे. लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेऱ्याच्या सहाय्याने चांद्रयान सध्या सुरक्षित जागा शोधत आहे. उतरताना दगड किंवा खोल खंदक नसेल अथवा इतर अडथळे बघूनच यान लँड करेल. अशी माहिती इस्रोने ट्वीट करुन दिली. योग्य जागेची निवड केल्यानतंर चांद्रयानचं लँडिंग होईल. संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या या मोहिमेवर लागलं आहे.

काल चांद्रयान-3 पूर्वीच रशियाचं लूना-25 हे चंद्राच्या दक्षिण भागात लँड होणार होतं. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे लूना 25 चं लँडर चंद्रावर क्रॅश झालं. यामुळे रशियाचं स्वप्न भंगलं आहे. केवळ रशियासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी ही एक दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता भारताच्या मोहिमेवर लागून राहिल्या आहेत. चांद्रयानने यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग केल्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत एकमेव देश ठरणार आहे.