जळगाव : आपल्याला बदल करावयाचा आहे पण तो सहजासहजी होणार नाही. सरकारच्या चुकीच्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवाल तरच चांगला निकाल मिळू शकतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.
पक्षाच्या जिल्हा कार्यालयात बोलताना ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात आपल्या पक्षाला चांगली संधी आहे. आपली यंत्रणा विरोधी पक्षापेक्षा अधिक चांगली पाहिजे. जळगाव जिल्ह्यात आधीपेक्षा चांगले यश मिळवायचे असेल तर आपल्याला अधिक परिश्रम घ्यावे लागतील, असे आवाहनही त्यांनी केले.
शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे जिल्हा दौर्यावर आहेत. पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, बुथ कमिट्या सक्षम करण्यावर भर द्यायला हवा. या बुथ कमिट्यांद्वारे आपले विचार लोकांपर्यंत पोहचवता येतील. सरकारच्या चुकीच्या गोष्टी लोकांना सांगा. मतदारांना जागृत करा. महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबवा, अशा सूचना जयंतराव पाटील यांनी यावेळी केल्या.
तीनही पक्षात एकजुट
महाविकास आघाडीला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि अजूनपर्यंत मिळत आहे. तीनही घटक पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना पाठिंबा देत आहे. अशा परिस्थितीत आपल्याला चांगला निकाल मिळू शकतो. आपल्याला बदल घडवायचा आहे मात्र हा बदल सहजासहजी घडणार नाही. निवडणूक जवळ येताच आपल्याला प्रलोभने दाखवली जातील, परंतु त्याला न भूलता आपण योग्य भूमिका घ्यायला हवी. निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकण्यावर भर दिला जातोय. त्यामुळे हा प्रवास सोपा नाही, ही लढाई एकतर्फी नाही. आपण योग्य जम बसवला तर यश नक्कीच आपल्या पदरात पडेल, असा विश्वास जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, जळगाव शहराध्यक्ष अशोक लाड वंजारी, महिलाध्यक्ष वंदना चौधरी, महिला शहराध्यक्ष मंगला पाटील, ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, सहकार सेल जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, युवती जिल्हाध्यक्ष अभिलाषा रोकडे, किसान सेल अध्यक्ष सोपान पाटील, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष अरविंद मानकरी, ग्रंथालय सेल अध्यक्ष रिटा बाविस्कर, नझीर पठाण, संदीप भैय्या पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील,पंकज महाजन, ज्ञानेश्वर महाजन, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माने, विद्यार्थी सरचिटणीस रोहन सोनावणे आदी उपस्थित होते.