वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियात अचानक बदल, इंग्लंडला लोळवणाऱ्या फिरकीपटूची संघात एन्ट्री

पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने इंग्लंडला 4-1 ने पराभूत करत दमदार विजय मिळवला. आता दोन्ही संघ वनडे मालिकेत आमनेसामने येणार आहेत. ही मालिका आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी आपल्या खेळाडूंची यादी आधीच जाहीर केली होती. मात्र, पहिल्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

वरुण चक्रवर्तीची वनडे संघात निवड

6 फेब्रुवारीला पहिला वनडे सामना होणार आहे. त्याआधीच टीम इंडियाने फॉर्मात असलेल्या फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संघात समाविष्ट केलं आहे. बीसीसीआयने अधिकृत परिपत्रक काढत या निर्णयाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत वरुण चक्रवर्तीने प्रभावी कामगिरी करत 14 विकेट घेतल्या होत्या. विशेषतः राजकोटमध्ये त्याने पाच विकेट घेत शानदार प्रदर्शन केलं. त्यामुळे त्याला मालिकावीराचा (Player of the Series) पुरस्कारही देण्यात आला होता.

वनडे पदार्पणाची संधी?

वरुण चक्रवर्तीला नागपूरमध्ये भारतीय वनडे संघात स्थान देण्यात आलं आहे. तो अद्याप भारतासाठी एकही वनडे सामना खेळलेला नाही. मात्र, त्याचा उत्कृष्ट फॉर्म पाहता त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्ध त्याची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना 6 फेब्रुवारीला रंगणार असून, चाहत्यांचे लक्ष आता वरुण चक्रवर्तीच्या संभाव्य पदार्पणाकडे लागले आहे.