---Advertisement---
भुसावळ : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली असून, याबाबत प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ-इगतपुरीदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाला दौंड-मनमाड यार्डाशी जोडण्यासाठी यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
मनमाड स्थानक व यार्ड येथे प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक्स बसवले जाणार आहेत. यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक्सचे नियोजन केले आहे.
रविवार, दि. ७ रोजी होणारे मार्ग बदल
रामेश्वरम-ओखा एक्स्प्रेस ही रामेश्वरम येथून ५ रोजी सुटणारी गाडी पूर्णा, हिंगोली, अकोला, भुसावळ, जळगाव मार्गे ओखाकडे जाईल. तसेच नांदेड ते अमृतसर एक्स्प्रेस ही ७ रोजी नांदेडहून सुटणारी गाडी नियोजित मार्गाऐवजी पूर्णा, हिंगोली, अकोला, भुसावळमार्गे अमतसरकडे जाईल तसेच रविवार, ७ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर एक्स्प्रेस मुंबईहून एक तास उशिराने, पुणे ते राणी कमलापती हमसफर एक्स्प्रेस ही गाडी पुणे येथून दीड तास उशिरा सुटेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते माँ बेल्हा देवी धाम एक्स्प्रेस गाडी १ तास आणि भुसावळ ते देवळाली एक्स्प्रेस ही गाडी भुसावळ येथून नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा सटेल, अशी माहिती देण्यात आली असून, प्रवाशांनी नोंद द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.