तरुण भारत लाईव्ह । जळगाव : जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत १ एप्रिल २०२३ पासून बदल करण्यात येणार आहे. उष्माघात उपाययोजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांची वेळ आता सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत असणार असून असे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जारी केले आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी उष्माघात उपाययोजनासाठी स्थानिक स्तरावर करावयाच्या नियोजनाविषयी सूचना दिलेल्या आहेत. त्यात जळगाव जिल्हा उष्माघात प्रवण असल्याने व ही बाब आपत्ती या सदरात येत असल्याने यापूर्वीच विविध उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळेत १ एप्रिलपासून सकाळी ७ ते दुपारी १ असा बदल करण्यात आला आहे. तसेच उष्माघाताची तीव्रता लक्षात घेऊन संबंधितांनी तत्काळ कार्यवाही करावी, सदर आदेश सर्व शाळांना बंधनकारक आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.