चारीत्र्याचा छळ असह्य : कुंभारखेड्यातील विवाहितेची आत्महत्या

तरुण भारत लाईव्ह रावेर : लग्नातील हुंड्याचे दिड लाख रुपये आणावेत तसेच विवाहितेचे चारीत्र्य चांगले नाहीत म्हणून छळ केल्यानंतर कुंभारखेड्यातील विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह चौघांविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अरुणा मनोज कटोणे (19, धामणगाव तांडे, ता.मुक्ताईनगर, ह.मु.कुंभारखेडा) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

चौघांविरोधात गुन्हा : तिघांना अटक
मयत विवाहितेचे वडिल तुळशिराम बाबूराव ईटावल (49, धामणगाव) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी अरुणाचा संशयित मनोज विकास कटोने याच्याशी विवाह झाल्यानंतर पतीसह सासरच्यांनी मुलीच्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेतला शिवाय लग्नात राहिलेले हुंड्याचे दिड लाख रुपये आणावेत म्हणून लग्नानंतर तगादा लावला तसेच तिला शिविगाळ करून मारहाण केली तसेच मुलीशी बोलणेही बंद केले. या सर्व प्रकाराला कंटाळून मुलगी अरुणा हिने गळफास घेतला. विवाहितेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी पती मनोज विकास कटोणे, सासरे विकास पांडुरंग कटोणे, जेठ कृष्णा विकास कटोणे आणि जेठानी रीना कृष्णा कटोणे (सर्व रा. कुंभारखेडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.